राष्ट्रीय किसान दिनाच्या निमित्ताने संपतराव पवार यांच्याशी बातचीत…
शेतीसाठीच्या पायाभूत सुविधांचा खर्च सरकारने केला तर शेतीतील तोटा आटोक्यात येईल - संपतराव पवार
संपतराव पवार हे सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी भागात तळागाळातल्या शेतकर्यांसाठी काम करणारे कार्यकर्ते. त्यांच्या परिसरातील शेतीप्रश्नांचा त्यांचा गाढा अभ्यासही आहे. शेतकर्यांचे प्रत्यक्ष जमिनीवरचे प्रश्न त्यांनी अनुभवले आहेत; त्यासाठी लढेही उभारले आहेत. शेतीप्रश्नाबाबत देशभरात चर्चा सुरू असताना मातीत गाडून घेऊन काम करणार्या या ज्येष्ठ कार्यकर्त्याशी युनिक फीचर्सच्या पत्रकारांनी साधलेला संवाद.
१) तुम्ही गेली पन्नासेक वर्षं शेती क्षेत्राशी निगडित आहात. स्वतः शेती करता आहातच, शिवाय शेतकर्यांच्या प्रश्नांवर लढताही आहात. या सर्व काळात आपल्याकडच्या शेतीची परिस्थिती कितपत बदलत गेली, बिघडत गेली असं वाटतं?
- शेतीतली परिस्थिती कशी बदलत गेली याचा विचार करायचा असेल तर आपल्याला शेतीच्या प्रवासाची दोन टप्प्यांमध्ये विभागणी करावी लागेल. हरितक्रांतीपूर्वी आणि हरितक्रांतीनंतर. हरितक्रांतीपूर्वीची शेती प्रामुख्याने श्रमाधारित होती. शिवाय बियाणांच्या वगैरे बाबतींत शेतकरी स्वयंपूर्ण होता. स्वतःच्या शेतातलं धान्यच पुढच्या वर्षीच्या बियाणांसाठी राखून ठेवलं जायचं. पण हरितक्रांतीनंतर एक नवी विकासनीती समोर आली. वाढत्या लोकसंख्येसाठी वाढीव उत्पादन मिळवण्याच्या चांगल्या उद्दिष्टाने ती राबवली गेली असं मानलं, तरी प्रत्यक्षात कालांतराने त्याचे अनेक दुष्परिणाम दिसू लागले....